विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 :
उमेदवारांकडून प्रलोभन : खर्च निरीक्षकांकडे करा तक्रार
गडचिरोली दि. २६: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही उमेदवार किंवा पक्षाकडून आमिष अथवा प्रलोभन दाखविणेकरीता वस्तुंचे वाटप करुन आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवण्याचे आवाहन निवडणुक खर्च निरीक्षक राजेश रामाराव कल्याणम यांनी केले आहे.
नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्र. 1950 किंवा निवडणुक निरीक्षक (खर्च). राजेश रामाराव कल्याणम यांचा मोबाईल नंबर 9420067626 यावर तक्रार नोंदवता येईल. यासोबतच 67- आरमोरी विधानसभा मतदारसंघ करिता 9403326705 या क्रमांकावर, 68- गडचिरोली विधानसभा मतदारसंघ करिता 8261824675 आणि 69- अहेरी विधानसभा मतदारसंघाकरिता 8999325319 या सहाय्यक निवडणुक खर्च निरीक्षकांकडील संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवता येतील.
०००
गडचिरोली, (जिमाका) दि.24: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी 68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. डॉ. मिलिंद रामजी नारोटे (भारतीय जनता पार्टी) व डॉ. देवराव मादगुजी होळी (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. 67-आरमोरी (अ.ज.) व 69-अहेरी (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. तर 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात कालपर्यंत दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
आज 24 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 6 व्यक्तींनी 16 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 7 व्यक्तींनी 19 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 6 व्यक्तींकडून 9 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन दिवसात एकूण 137 नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.
गडचिरोली : भाजपने जाहीर केलेला पहिल्या यादीत जिल्ह्यातील केवळ आरमोरीचा समावेश आहे. यात गडचिरोलीचे नाव नसल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली असून विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांना उमेदवारी दिल्यास भाजपमधील एक मोठा गट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर होळींनी देखील समर्थकांना पुढे करून दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गडचिरोली विधानसभेसाठी भाजपमधून विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांच्या व्यतिरिक्त डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी या तिघांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आमदार होळी यांच्या विरोधात आदिवासी समाजाची असलेली नाराजी आणि लोकसभेत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी, यामुळे याठिकाणी उमेदवार बदलण्यासंदर्भात पक्षाकडून चाचपणी करण्यात आली. दुसरीकडे संघपरिवाराचे जवळचे असलेले डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासाठी संघ आणि भाजपधील महत्वाचे पदाधिकारी आग्रही आहे. त्यामुळे भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. पहिल्या यादीमध्ये गडचिरोलीचे नाव नसल्याचे बघून आमदार होळी समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी होळी यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.
मात्र, यात भाजपचे महत्वाचे पदाधिकारीच अनुपस्थित होते. उमेदवारी जाहीर करण्यात विलंब होत असल्याने डॉ. मिलिंद नरोटे समर्थकदेखील अस्वस्थ झाले आहे. भाजप आणि संघातील एक मोठा गट नरोटे यांच्या पाठीशी आहे. त्यांचा होळींच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे आज गुरुवारी नरोटे समर्थकांनी एक बैठक आयोजित केली असून नरोटे यांना उमेदवारी न मिळाल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देणार असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे गडचिरोलीची उमेदवारी जाहीर करताना भाजप नेतृत्वाची चांगलीच दमछाक होणार आहे.
आमदार होळी समर्थकांची २५ ला सभा
आमदार होळी उमेदवारीसाठी दाबतंत्राचा वपार करीत असून २५ ऑक्टोबरला त्यांनी समर्थकांची सभा आयोजित केली आहे. यामध्यमातून ते पक्षावर दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे गडचिरोली भाजपामध्ये मोठे राजकीय वादळ उठण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे डॉ. उसेंडी हे देखील उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यांच्यासाठी चिमूरचे आमदार बंटी भंगाडिया मैदानात उतरले आहे. उसेंडी यांना उमेदवारी मिळावी म्हणून भंगाडिया यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना गळ घातली आहे. परंतु स्थानिक भाजप पदाधिकारी त्यांच्यासाठी अनुकूल नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपला बंडाखोरीचा फटका बसू शकतो
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून अहेरी विधानसभेतून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहेरीत आता पिता विरुद्ध पुत्री, अशी लढत होणार आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्री यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात बंड करून शरद पवार गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून अहेरी विधानसभेतील राजकारणाची राज्यपातळीवर चर्चा होती. सोबतच काँग्रेसनेही या जागेवर आपला दावा कायम ठेवल्याने आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या. महिनाभरापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. अहेरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपारिक दावा राहिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस आग्रही असताना देखील शरद पवार गटाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ४५ उमेदवारांच्या यादीत भाग्यश्री आत्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अहेरीत ‘वडील विरुद्ध मुलगी’ असा थेट सामना होणार आहे. दरम्यान, भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर मंत्री आत्राम यांचे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात होते. परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडले. त्यामुळे ते आता अपक्ष लढतील अशी शक्यता आहे. अहेरीतील एकंदरीत राजकीय समिकरण बघता यंदा कधी नव्हे ते चार तुल्यबळ उमेदवार उभे राहणार आहे. त्यामुळे विजश्री खेचून आणण्यासाठी सर्वांचाच कस लागणार आहे.
काँग्रेसही लढणार
महाविकास आघाडीकडून भाग्यश्री आत्राम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये असंतोष बघायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवार हे हणमंतू मडावी यांच्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या बैठकीत वाडेट्टीवार यांनी अहेरीची जागा आम्ही लढवणारच यावर ठाम होते. गुरुवारी दिवसभर काँग्रेसच्या गोटात घडलेल्या घडामोडीनंतर हणमंतू मडावी देखील काँग्रेसकडून नामांकन दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१९ मध्ये देखील काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले. पुन्हा तीच पारिस्थिती उद्भवल्यानेमहाविकास आघाडीत वाद पेटण्याची चिन्हे आहेत.